तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील एसटी महामंळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सव काळात महामंडळाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येणार आहे. चार – पाच नव्हे तर तब्बल २५ एस.टी. बसगाड्या गणेशोत्सव कालावधीत पूणे -मुंबईला धावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० दिवस रोजच्या २६ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा त्रास तालुक्यातील प्रवाशाना होणार असून महामंडळाच्या नावाने शिमगाच साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अधिक माहिती अशी, चंदगड तालुक्यातील सर्व प्रवाशांसाठी सूचना चंदगड आगारा कक्ष प्रसारीत करणेत आली आहे. यामध्ये दिनांक ३१ ऑगष्ट २०२२ रोजी श्री गणेश चतुर्थी आहे व दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी आहे. चंदगड तालुक्यातील बहुतांश नागरिक हे शिक्षण व नोकरी कामानिमित्त मुंबई पुणे येथे वास्तवास आहेत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात गेली दोन वर्ष गणेशोत्सव विविध निर्बंधात साजरा करणेत आला. यावर्षी कोणतेही निर्बंध नसले कारणाने गणेशोत्सव साजरा करणेसाठी पुणे- मुंबई कडे असणारे आपल्या जिल्हा तालुक्यातील गावी येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे चंदगड आगाराच्या १४ बसेस ह्या मुंबईला तसेच पुण्याला ११ बसेस पाठविण्याच्या सूचना विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या असून मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांच्या सुचनेनुरूप सदर प्रवाशांची सोय होणेसाठी खास सोय करणेत आलेली आहे. याकामी चंदगड आगाराच्या काही अंशी फेऱ्या दिनांक २७/०८/२०२२ ते दिनांक ११/०९ /२०२२ पर्यंत स्थगित केलेल्या आहेत. याची सर्व प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. केवळ चंदगड आगाराच्या एवढ्या मोठ्या संख्येने बसगाड्या बाहेर जाणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार हे मात्र निश्चित.
Belgaum Varta Belgaum Varta