


‘शारदेच्या’ प्रांगणात ज्ञानाचा गजर करणारे वारकरी मुख्याध्यापक मधुकर सुतार सेवानिवृत्ती
शिनोळी (रवी पाटील) : शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसवण्याचं काम करते. शिक्षण माणसाच्या आयुष्यात उजेड बनून येतं आणि माणसाचं जीवन उजळवून टाकतं. म्हणून महत्त्वाचे असतात शिक्षक… जे आपल्यासाठी ज्ञानदानाचे काम करतात आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी वर्तमान सुधारतात. शिक्षकाची जबाबदारी फार मोठी असते. किंबहुना देशाचं भविष्य शिक्षकांच्या हातात असतं. त्यामुळे देशाला घडवणारे शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतात. असेच एक शिक्षक विद्यार्थी घडवताना आपली समाजिक बांधिलकी जपणारे, शिक्षण क्षेत्राविषयी अंतरीची तळमळ असणारे एक प्रामाणिक शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक मधुकर सुतार.
मुळचे खानापूर तालुक्यातील आसोगा गावचे असून चंदगड तालुक्यातील सुरुते येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये ३३ वर्षापासून ज्ञानदानाचे अविरत सेवा केली आणि शाळेचे खऱ्या अर्थाने त्यांनी नंदनवन केले. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. तसेच आपल्या शाळेला कोल्हापूर जिल्हात ‘स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार ‘ मिळवून दिला. यामुळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
एक शिस्तबद्ध , कर्तव्यनिष्ठ व नाविण्याचा ध्यास असणारे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वभारत सेवा समिती बेळगावचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी होते.
मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक एस. ए. पाटील यांनी केले. मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
संस्था, शाळा, सोसायटी व सन् 1989 ते 2022 पर्यंतच्या एस. एस. सी. विद्यार्थ्यांकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध शाळा, नातेवाईक व मित्र परिवार यांच्यावतीने ही सत्कार करण्यात आला.
यावेळी या विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक एस. एस. मुचंडी यांनी मनोगतातून स्थापने पासूनचा इतिवृत मांडून सुतार सरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच मारुती पाटील, एन. टी. भाटे, रवी पाटील, मनोहर भुजबळ, युवराज कांबळे, एम. के. बेळगावकर, एस. एस . सुतार, नारायण चोपडे, द्राक्षायणी सुतार व रूपाली वैजू सुतार यासह आदिंनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. टी. भाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मधूकर पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta