चंदगड : आज सकाळी पहाटे 3 च्या सुमारास तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांचे पाहणीपथक रात्री गस्त घालत असताना एका पोल्ट्री जवळ 10-12 व्यक्ती चार वाहनासोबत संशयितरित्या दिसून आले. यावेळी पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांना हटकले असता यांतील सर्व व्यक्ती पळून जाऊ लागल्यामुळे त्यातील दोन दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
सदर व्यक्तींकडून वाहनांची चौकशी केली असता स्नॅपर रायफल व वन्य प्राण्याचे मांस यावेळी आढळून आले. याविषयी वनविभागाचे अधिकारी प्रशांत आवळे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली असता सांबर सदृश्य प्राण्याचे मांस मिळून असल्याचे समोर आले.
या कारवाईमधील आरोपी हे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस व वन विभागाने संयुक्तरित्या केली आहे. सदरची पुढील कारवाई एसीएफ एन. एस. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत आवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे फाटा हे करत आहेत.