चंदगड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नेते व कार्यकर्ते अजित पवार गटाकडे वळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही प्रमाणात हा अंदाज खरा ठरला. काही आमदार राष्ट्रवादीतून अजित पवार गटाकडे गेले. या उलट अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली की काय अशी परिस्थिती अजित पवार गटाची झाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे कांही नेते शरद पवार गटाकडे येत असल्याचे दिसून येत आहे. चंदगड तालुक्यातील भाजपा नेते सुरेश घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं जाहीर केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यायी नेत्यांना जोडायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाजप नेते सुरेश घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे आता येणारे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच घाटगे यांच्या प्रवेशाने शरद पवार गटाला बळकटी आल्याचे दिसून येत आहे. पवार गटाकडून पुन्हा नवीन चेहरा चंदगडच्या राजकारणात उतरणार आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाकडून नवीन चेहरे शोधण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार गटाकडे गेले. त्यामुळे चंदगड विधानसभेचे शरद पवार गटाकडून आश्वासन चेहऱ्याची पाहणी केली जात आहे. सुरेश घाटगे हे भाजपमधील सक्रिय कार्यकर्ते होते मात्र त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांनी कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात शरद गटाकडून पुन्हा नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे.