
चंदगड : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रमाणे आमदार राजेश पाटील यांच्या मागणीनुसार चंदगड तालुक्यातही काजू बोर्ड स्थापन करण्यास आज महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. गेली तीन वर्षे आमदार राजेश पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालूक्यात काजू बोर्ड स्थापन करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या दोघांच्याही प्रयत्नाना प्रचंड मोठे यश लाभले असून चंदगड विभागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड लाभ यामुळे होणार आहे.
राज्यातील काजू फळ पिकाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना संदर्भाधीन दि. १६ मे २०२३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये काजू मंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने विविध निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी काजू मंडळाचे मुख्यालय, वाशी नवी मुंबई येथे तर विभागीय कार्यालय, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे राहील असे नमूद करण्यात आले होते. पण कोल्हापूर जिल्हयातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्हयातील चंदगड येथेही स्थापन करण्याची जोरदार मागणी आमदार राजेश पाटील व खासदार संजय मंडलिक यानी शासनाकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र पुडणविस यांनी या मागणीला मान्यता देत “महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्हयातील चंदगड येथे स्थापन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली. यामुळे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाना यश मिळाले असून याचा लाभ निश्चितच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta