दड्डी : ता. चंदगड येतील कुदनुर गावची सुकन्या कुमारी छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
घरची परिस्थिती अतिशय बेताची. वडील अशिक्षित शेतकरी पण या परिस्थितीचा बावू न करता तिने जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पीएसआय पदाला गवसणी घातली. मुळातच हुशार दहावीला कालकुंद्री केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळवला. शालेय जीवनातच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू केली व तिच्या या पहिल्या प्रयत्नामध्ये पीएसआय पदाला गवसणी घातली व कुदनुर गावचे नाव उज्वल केले. गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान छायाने मिळवला व तिने आपला आदर्श गावातील इतर मुलींच्या समोर ठेवला. तिच्या यशामुळे कुदनुर गावातील सर्व नागरिकांना तिचा सार्थ अभिमान आहे. तिच्या या यशामध्ये तिचे आई, वडील व तिचे काका श्री. नागेश बंबर्गेकर व तिच्या कुटुंबांचे फार योगदान लाभले आहे. या तिच्या यशाबद्दल कुदनुर पंचक्रोशीमध्ये अभिनंदन होत आहे.