मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी वाटून खाणारा आपला सवंगडी कै. मोहन कांबळे यांच्या अचानक जाण्याने सारा मित्र परिवार हळहळला.
वर्ग-मित्रांनी आपण हि त्यांच्या कुटूंबासाठी काही तरी छोटीसी मदत करावी या भावनेतून आपल्या वर्गमित्रांच्या मस्ती की पाठशाळा या व्हाट्सअप ग्रुपवर आवाहन करून निधी संकलन केला. आपले शहरात नोकरी करणारे मित्र, सैनिक मित्र, स्थानिक मित्र, मैत्रीणीनी ही आपली मदत पाठविली. आज स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी मराठी विद्यामंदिर तडशींनहाळ येथे कै. मोहन यांची पत्नी मिनाक्षी कांबळे व मुलगी प्रियांका व सानिया कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल संच, लहान मुलीच्या नावे ठेवपावती, दोन्ही मुलींना वर्ष भराचे शालोपयोगी साहित्य, पत्नी करिता १,५०,०००/- विमासंरक्षण असणारी अपघात विमा पोलिसी सुपूर्द केली.
मदत स्वीकारताना मोहन यांची पत्नी व मुली ओक्साबोक्शी रडू लागल्या. हे पाहून उपस्थितांची मने हेलाऊन गेली. त्यांनी आपल्या सर्व पतीच्या वर्गमित्रांचे मनपूर्वक आभार मानले. मराठी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक तानाजी नाईक, दिपक चांदेकर, माजी मुख्याध्यापक यलाप्पा पाटील, तंटामुक्त सदस्य नारायण दळवी, माजी सैनिक महादेव बोलके, डी.जे.पाटील सर, अध्यापिका किर्ती पाटीलसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.