कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चंदगडमधील भाजप नेते शिवाजी पाटील यांनी मेळावा घेत उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. या मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दुसरीकडे, या मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाटील यांना अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
मेळाव्यात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गेल्या निवडणुकीमध्ये शिवाजी पाटील काही मतांनी पराभूत झाले. मात्र, यावेळी त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणायचं आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदार राजेश पाटील म्हणाले की, महायुती जर अबाधित ठेवायचे असेल आणि लोकसभेला ज्या पद्धतीने झालं ते विधानसभेला व्हायचं नसेल तर त्या पक्षातील नेत्यांनी इच्छुकांना समजावून सांगावे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांनी या ठिकाणी राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी पाटील यांच्या नावाची घोषणा करणे योग्य नसल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. अजितदादा या सगळ्याची योग्य ती दखल घेतील, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली.