चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस पकडले. जागरूक नागरिकांच्या मदतीने ही कारवाई चंदगड पोलिसांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आकाश राजू भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनेतील संशयित आरोपी सय्यद इस्माईल सय्यद अल्लाउद्दीन मिरचोणी, (वय ४८, रा. पेडामोल, केंपे गोवा) व अमोल विद्याधर मोहनदास (वय ४०, सह्याद्री नगर- बेळगाव) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलीसातून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, वरील संशयित आरोपी आपल्या फायद्यासाठी गाय, बैल, म्हैस यांची कत्तल करून त्यांचे अंदाजे दहा टन मास बेळगाव कडून गोव्याकडे घेऊन चालले होते. कोदाळी गावाच्या हद्दीत वाहतूक करत असलेल्या टेम्पो टाटा १२१२ गाडी नंबर केए २२, डी ६३२७) पकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत १५ लाख रुपयांचे गोमांस, ७ लाख रुपये रुपयांचा ट्रक व ४ लाख रुपयांची गाडी नंबर काळ्या रंगाची सुझुकी कार असा २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांच्यावर भारतीय दंड विधान संहिता ३२५, ३ (५), व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ क, ९ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२८ रोजी सकाळी घाटातून जाणाऱ्या या ट्रकच्या हौद्यात खाली गोमांस आणि त्यावर दुधी भोपळे तसेच भाताची फोलपटे यांची पोती भरण्यात आली होती. ड्रायव्हरकडे गाडीत चाळीस हजार रुपयांची भाजी असल्याची पावती सुद्धा होती. त्यामुळे पोलिसांनी चेक केले तरी ही तस्करी उघडकीस येण्याची शक्यता कमीच होती. तथापि सदरचा ट्रक नादुरुस्त झाल्याने वाटेत थांबला. यानंतर मार्गावरून जाणारे वाहनधारक व प्रवासी यांना गाडीमध्ये काही असण्याची शंका आल्याने बिंग फुटले. नंतर गाडी अडवून हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांनी आरोपी व वाहने ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केल्याचे समजते. या घटनेवरून तिलारी घाटातून अशी बेकायदेशीर वाहतूक नेहमी होत असावी या शंकेला दुजोरा मिळाला आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल धवीले या करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta