चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तेवढा काळ घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, बेळगाव परिसरातील वाहनधारकांना कोकण व गोव्याला जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग ठरतो. त्याशिवाय कर्नाटक, केरळ राज्यांतील अवजड वाहतूक याच मार्गान मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षभरात घाटातील एका वळणावर सातत्याने अपघात झाले. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटची भिंत उभारली होती. मात्र, अपघातांमुळे ती कोलमडली आहे. शिवाय वळण आणि उतार असल्यामुळे हे क्षेत्र अपघात प्रवण बनले आहे. या मुद्यावर एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी एसटी सेवेसाठी तयार नव्हते. सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ तिलारीनगरपासून पुढे घाटातील गावांना जोडणारी एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे चंदगड, गडहिंग्लज परिसरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय झाली होती. त्याचा रोष एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत होता. मात्र अपघातप्रवण क्षेत्राची योग्य प्रकारे दुरुस्ती केल्याशिवाय वाहतूक सुरू करता येणार नाही, असा अहवाल वाहतूक विभागाकडून दिला जात असल्याने एसटीचे अधिकारी गाडी सुरू करण्यास धजावत नव्हते. अखेर प्रवासी आणि नागरिकांचा वाढता दबाव विचारात घेऊन बांधकाम विभागाने या क्षेत्राच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. या ठिकाणी गॅबीयन पद्धतीने भिंत उभारण्यात येणार आहे.