छत्रपती शिवरायांबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठमोळ्या अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते.’, असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले असून यामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले की, ‘पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. आग्र्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. तसंच, ‘मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडं रंगवून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.’, असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.