Monday , September 21 2026
Breaking News

पावसाची दडी; पेरणीच्या तोंडावर शेतकरी चिंताग्रस्त

Spread the love

 

बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाने यंदा अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. सोमवारी दिवसभर पावसाची शक्यता निर्माण होऊनही अखेर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांनाच आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सोमवारी सकाळपासून कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आल्याने दमदार पावसाची चिन्हे दिसून आली. काही काळ परिसरात अंधारून आले होते. त्यामुळे पाऊस बरसणार, अशी आशा शेतकरी व नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र काही वेळातच वातावरणात बदल होऊन ढग विरळ झाले आणि पाऊस न पडताच निघून गेल्याने निराशा पसरली.

यंदा मान्सूनपूर्व पावसाचा अभाव असल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम झाला आहे. विशेषतः भात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत पूर्ण केली असली तरी पुरेशा ओलाव्याअभावी पेरणीची कामे रखडली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हवामान खात्याने मे अखेरीस मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र जून महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतीत ओलाव्याची कमतरता भासत आहे. मशागतीची कामे पूर्ण करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊन चांगला पाऊस पडावा आणि पेरणीच्या कामांना गती मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. पावसाकडे लागलेले बळीराजाचे डोळे आता आगामी काही दिवसांतील हवामानाच्या घडामोडींवर खिळून राहिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *