Monday , September 21 2026
Breaking News

कर्तव्य ॲपच्या फेस रिडिंगमुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी

Spread the love

 

बेळगाव : शिक्षण विभागाने शिक्षकांची उपस्थिती अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी सुरू केलेल्या कर्तव्य (सीएएमएस) ॲपमुळे शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून फेस रिडिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक शिक्षक मोबाईलवर हजेरी नोंदविण्यात गुंतलेले दिसून आले.

मात्र, ॲपमधील तांत्रिक त्रुटी, सर्व्हरची संथ गती आणि फेस रिडिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण न होणे यामुळे शिक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळेच्या निश्चित वेळेतच उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले असून, महिन्यात तीन वेळा फेस रिडिंग प्रक्रियेस उशीर झाल्यास एका दिवसाची गैरहजेरी नोंदविण्याची तरतूद असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत शिक्षकांना शाळेत येताना ‘इन’ आणि शाळा सुटताना ‘आऊट’ अशी दोन्ही नोंदी कराव्या लागत आहेत. वेळेपूर्वी ‘आऊट’ झाल्यास किंवा नोंदीत त्रुटी आढळल्यास गैरहजेरी दाखविली जाण्याची भीती शिक्षकांना सतावत आहे. त्यामुळे अध्यापनासोबतच उपस्थिती व्यवस्थापनाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.

एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक प्रयत्नशील असताना, दुसरीकडे उपस्थितीसाठी मोबाईलचा सतत वापर करावा लागत असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्तव्य ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून प्रणाली अधिक सुलभ व परिणामकारक करण्याची मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

शाळांच्या पहिल्याच दिवशी उपस्थिती नोंदविण्यासाठी शिक्षकांची झालेली धावपळ आणि ॲपमधील त्रुटींमुळे निर्माण झालेला गोंधळ हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षक संघटनांनीही या समस्यांकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *