Sunday , July 26 2026
Breaking News

‘सरकारी वाढदिवस’चा जल्लोष; १ जूनला शुभेच्छांचा सोशल मीडियावर वर्षाव

Spread the love

 

 

बेळगाव : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि विशेष दिवस मानला जातो. मात्र पूर्वी जन्मनोंदीची व्यवस्था सर्वत्र उपलब्ध नसल्याने अनेकांची जन्मतारीख शाळेत प्रवेश घेताना शिक्षकांनी ठरविलेली असायची. त्यातूनच ‘१ जून’ ही जन्मतारीख हजारो जणांच्या अधिकृत नोंदीत आली आणि कालांतराने तीच त्यांची ओळख व वाढदिवस ठरली.

रविवार, १ जून रोजी अशाच ‘सरकारी वाढदिवस’ असलेल्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरी आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढदिवसाच्या शुभेच्छांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

पूर्वी शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रामुख्याने १ जूनपासून होत असे. शाळेत प्रवेशासाठी मुलाचे वय पूर्ण झाल्याची नोंद करण्याच्या उद्देशाने पालक व शिक्षकांच्या सहमतीने १ जून ही जन्मतारीख नोंदवली जात असे. त्यामुळे आज पन्नाशी व त्यापुढील वयोगटातील अनेकांची अधिकृत जन्मतारीख १ जून असल्याचे दिसून येते.

याच पार्श्वभूमीवर दरवर्षी १ जून हा दिवस अनेकांसाठी एकत्रित ‘सरकारी वाढदिवस’ म्हणून साजरा होताना दिसतो. यंदाही अनेकांनी केक कापून, मित्र-परिवारासोबत समारंभ आयोजित करून आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा स्वीकार करत हा दिवस उत्साहात साजरा केला.

एकेकाळी केवळ शालेय नोंदीसाठी निश्चित झालेली १ जून ही तारीख आज हजारो जणांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस बनली असून, ‘सरकारी वाढदिवस’ ही संकल्पना आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *