Sunday , September 8 2024
Breaking News

दाटेत उगवली डीजीटल पहाट

Spread the love

महाराष्ट्र राज्यातला पहिलाच अभिनव उपक्रम

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारत देश आज सुध्दा गावगाड्यातच अडकला आहे. आजच्या ऑनलाईनच्या काळात फोन संदर्भात अनेक समस्या गावातील लोकांसमोर आहेत. सरकारच्या अनेक योजनांपासून गावातील लोक अनभिज्ञ आहेत. त्या योजना त्यांच्या पर्यत पोहचतच नाहीत. हीच समस्या ओळखून दाटे येथील घनश्याम पाऊसकर (मंत्रालयीन कक्ष अधिकारी) यांनी गावातील सुशिक्षीत तरूणांना एकत्र करून रयत सेवा फौंडेशनची स्थापना केली. फौंडेशनमार्फत महाराष्ट्र राज्यातील पहिल्या लक्ष्मीनारायण ई – ग्राम केंद्राचे उद्घाटन तहसिलदार प्रशांत जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फौंडेशनचे उपाध्यक्ष संजय साबळे यांनी केले. यावेळी असंघटित कामगार, कष्टकरी लोकांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई -श्रम कार्डाचे वितरण करण्यात आले. ई दाटे ग्रुप ग्रामपंचायतीमधील पाच गावात “ई स्मार्ट व्हिलेज” ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. सरकारी सेवा, पॅनकार्ड, आधार, वीमा योजना, बँकींग सेवा, मोबाईल, वीज बील भरणे, प्रवास सेवा बुकिंग इ.सर्व सुविधा ई- ग्राम योजनेमध्ये घरपोच देण्यात येणार आहेत.
‘आजचे युग हे डिजीटल युग आहे. प्रत्येक गावात डिजीटल क्रांती झाली तर गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. ई-ग्राम संकल्पनेमुळे प्रत्येक व्यक्तीचा वेळ आणि पैसा वाचेल.’ असे प्रतिपादन तहसिलदार प्रशांत जाधव यांनी केले.
नायब तहसिलदार विक्रमादित्य घाटगे म्हणाले की, ‘सामाजिक बांधिलकीचे भान असलेलीच माणसे जनसेवेचे व्रत घेऊन समाजात जागृती करतात. आणि तोच समाज विकासाच्या वाटेवर चालू लागतो. त्यासाठी चांगल्या कामांना नेहमी साथ द्या. ‘

शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद शिणगारे म्हणाले की, ‘गावच्या रुढी परंपरा जपून स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे. यासाठी नवीन जून्याचा मेळ घालणे गरजेचे आहे.

‘शासनाच्या प्रत्येक योजना डीजीटल माध्यमातून लोकांना घरपोच देण्यासाठी ई-ग्राम हा उपक्रम खूप फायदेशीर आहे. या सेवेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा’ असे मत लक्ष्मीनारायण ई- ग्रामचे संस्थापक विनायक पाऊसकर यांनी मांडले.
‘बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील दाटे गावा आता जागा झाला आहे. ई-ग्रामच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीला माफक दरात घरपोच ऑनलाईन सेवा देण्याचा मानस आहे,’ असे मत ई-ग्रामचे संकल्पक घनश्याम पाऊसकर यांनी मांडले.
यावेळी एम. टी. कांबळे, प्रा.विलास नाईक, प्रकाश खरूजकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला फौंडेशनच्या अध्यक्षा ऋचा पाऊसकर, पी. टी. पाटील, मधुरा साबळे, परशराम किणेकर, शाहू खरूजकर, मारुती किंदळेकर, ज्ञानेश्वर गावडे, मनोज खरूजकर, प्रकाश खरुजकर, अनिल व्हडावडेकर, सागर रेडेकर, राजू बुरूड, नारायण मोरे, राजू मोटर, निंगाप्पा मोटर, सुनिल गावडे, अशोक धुरी , शिवाजी मोरे, जोतीबा मोरे, आण्णा मोरे, संदीप गुरव, किरण नाईक, सरिता गुरव, माधुरी मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि पाटील तर आभार प्रकाश खरूजकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *