
सदलगा : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदलगा पोलिस ठाण्यातर्फे ठाण्याच्या व्याप्तीमधील सर्व गावातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील गणेश मंदिरात बोलावून एसपी संजीवकुमार एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आणि डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील, सदलगा पीएसआय भरत एच. यांच्या उपस्थितीत शांतता सभा घेण्यात आली.
सर्व मंडळांनी मंडप, विद्युत सेवा, पुरसभे, हेस्कॉम, अग्निशामक दल इत्यादी खात्यांच्या रीतसर परवानगी घेऊनच मंडप घालावेत यातून एक होते, की मंडळांच्या नोंदी होतात, आपत्कालीन परिस्थितीत त्यांना व्यवस्थित मदतकार्य पुरवणे सोयीचे होते.
सदलगा पोलिस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये २८ गावांतील ३५५ मंडळे आहेत. सर्वांसाठी पोलिस संरक्षण देणे शक्य होत नाही मात्र रीतसर सर्व ठिकाणी म्हणजे पोलिस ठाणे, अग्नी नामक दल, पुरसभे, हेस्कॉम आदी ठिकाणच्या परवानग्या घ्याव्यात आणि त्या त्या मंडळांचे किमान दोन प्रतिनिधी कायमस्वरूपी मंडपात हजर असावेत अशा सूचना डीवायएसपी यलिगार यांनी केल्या.
एसपी संजीवकुमार पाटील म्हणाले, कोविडच्या महामारीतून आपण वाचलेलो आहोत याचे भान ठेवून गणेशोत्सव उत्साहात, आनंदात समारंभपूर्वक साजरा करा. महिला, वृद्ध, लहान मुले, परराज्यातून गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वांची सुरक्षितता सांभाळत सर्वांना आनंद मिळावा या भावनेने उत्सव साजरा करा.
सर्वांनी मंडपात लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, खुशीने उत्सव साजरा करा, कुणाशी स्पर्धा करु नका, ईर्षा करुन भांडण तंटा करु नका, गणेशोत्सवाचा आनंद सर्वांना घेऊ द्या. मिरवणूक मार्गातील खड्डे, आडवे येणारे झाडे झुडुपे आमच्या निदर्शनास आणून द्या त्याची योग्य ती व्यवस्था करुयात. गणेशोत्सव समारंभपूर्वक साजरा करा, असे आवाहन सर्व उपस्थितांना एसपी पाटील यांनी केले. तुम्ही मंडळाचे कार्यकर्तेच तुमच्या भागाचे रक्षक आहात आम्ही सरकारी नोकर, येतो, बदली होऊन जातो, तेंव्हा तुम्ही सर्वांनी आपली, आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता सांभाळत उत्सव साजरे करा पोलिस सर्वतोपरी मदतीस पुढे येतात, येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बेडकीहाळच्या बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे स्वागत पीएसआय भरत एच. यांनी केले. आभार सीपीआय आर. आर. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta