शौकीन आणि पशुपालकांकडून ‘लम्पी स्कीन’ पासून बचावासाठी अखंडित प्रयत्न
अंकली (प्रतिनिधी) : ‘लम्पी स्कीनमुळे पशुधनाला हादरे बसत आहेत. यामध्ये नामवंत जाती ही धोक्यात आल्या आहेत. पशुपालकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा खिलार बैलही ‘लम्पी’च्या कचाट्यात अडकत आहे.
लाख मोलाचा खिलार जगवण्यासाठी पशुपालकांकडून दररोज हजारो रुपयांचा खर्च होत आहे. सध्या शर्यतींवर तात्पुरती बंदी असली, तरी ज्या वेळी साथ आटोक्यात येईल त्या वेळी पुन्हा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. पण तोपर्यंत ‘खिलार’ची तब्येत चांगली राहण्यासाठी पशुपालकांकडून अखंडित प्रयत्न सुरू आहेत.
खिलार हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. शेती कामाबरोबरच शर्यतीसाठी खिलार बैल मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. शर्यत बंदी असताना ही जात धोक्यात आली होती. मात्र शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर हजारांच्या किमती लाखांमध्ये गेल्या. अनेकांनी गेल्या वर्षभरात लाखो रुपये खर्च करून खिलार बैलांची जोपासना केली आहे. सकस खाद्य घालून या बैलांची चपळता कायम राखण्यात शौकीन व पशुपालक अग्रेसर असतात. या साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून बैलांच्या आरोग्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवले जात आहे. जनावरांच्या गोठ्यामध्ये धूर करणे, पशुखाद्यामध्ये हळद मिश्रण करून त्यांना घालणे, तसेच त्वचेला संरक्षक असणाऱ्या साबणाचा वापर करून बैलांना दररोज स्वच्छता करण्याचे प्रयत्नशर्यत शौकिनांकडून होत आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे.
‘लम्पी’ आजार हा केवळ त्वचेवरच आघात करत नसून, आतील अवयवांनाही धोका निर्माण करत असल्याने शर्यत शौकिनात चिंतेचे वातावरण आहे. आतील अवयवांना धोका झाला तर खिलार बैल परत शर्यतीच्या रिंगणात त्या क्षमतेने उभा राहू शकत नाही. यामुळे रोग आपल्या गोठ्यात येऊच नये यासाठीच शर्यत शौकीन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. गोठ्यामध्ये डास व अन्य कीटकांचा वावर रोखणे, बैलांच्या त्वचेची काळजी घेणे हे महत्त्वाचे काम असल्याचे शर्यत शौकिनांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनहीु एकमेकांना याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून जलदगतीने लसी दिल्या जात आहेत.
—-–———————————-–————————–
आजपर्यंत आम्ही बहुतांशी वेळेला केवळ बैलांच्या खाद्यावर लक्ष केंद्रित करत होतो. पण आता मात्र अनिवार्यपणे त्यांची स्वच्छता व गोठ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. यासाठी आम्ही रात्रंदिवस जनावरांचे आरोग्य जपत आहोत. – सुनील असवाले, प्रगतशील शेतकरी मांजरी