तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “कोविड-१९च्या महामारीमुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यासाठी प्रशासकिय स्तरावरून सेतू अभ्यासक्रमासारखे प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेतु अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना क्रियाशील बनवणे आहे, ” असे प्रतिपादन प्राचार्य आर. आय. पाटील यांनी केले. ते चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व शिक्षक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात अध्यक्षपदावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एम. शिवणगेकर यांनी केले. यावेळी सेतू अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करताना संजय साबळे म्हणाले, “मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यास (ब्रीज कोर्स) तयार केला आहे. मागील वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांच्यात क्षमता किंवा अध्ययन निष्पती पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि आताच्या वर्गातील क्षमता व अध्ययन निष्पती यांना जोडणारा जो पूल बांधला आहे तो सेतू अभ्यास आहे.”
शिक्षण विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, टी. टी. बेरडे, टी. एल. तेरणीकर, बी.आर. चिगरे, एम. व्ही. कानूरकर, एस. एल. बेळगावकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रशांत मगदूम यांनी मानले.
