बेळगाव : बेळगावात चन्नम्मा सर्कल, बिम्स इस्पितळाकडे येणारे डॉ. आंबेडकर रोडसह सर्व रस्ते बुधवारी सकाळी पोलिसांनी अचानक बंद केले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचताना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऍम्ब्युलन्स चालकांनाही यामुळे बिम्सकडे जाताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली.
बेळगावातील चन्नम्मा चौक ते के एल ई इस्पितळापर्यंतचा रस्ता ग्रीन कॅरिडॉर घोषित करण्यात आला आहे. या मार्गावर बिम्ससह इतर खासगी हॉस्पिटल्स असल्याने ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच तेवढी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र याबाबत जनतेला कल्पना दिलेली नाही. त्यामुळे खरेदीच्या सवलतीच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करून परतणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. डॉ. आंबेडकर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाला. खुद्द पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांना घटनास्थळी येऊन पाहणी करावी लागली.
या रस्त्यावर बिम्स आणि केएलईसह रुग्णालये असल्याने आणीबाणीच्या आरोग्यसेवेत कसलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी हा रस्ता ग्रीन कॅरिडॉर घोषित केला आहे. तेथे कोणत्याही वाहन संचारला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून आपल्या कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊन मोठा वळसा घालून इच्छित स्थळी जाणे भाग पडले.