Monday , December 8 2025
Breaking News

कसोटीत न्यूझीलंड ‘अजिंक्य’; टीम इंडियाचा ‘विराट’ पराभव!

Spread the love

साउदम्पटन – कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखत पराभव करून पहिलेवहिले कसोटी अजिंक्‍यपद आपल्या नावावर केले. सामन्यात सातत्याने पावसाच्या व्यत्ययानंतरही रंगतदार स्थितीत आलेला सामना कर्णधार केन विल्यम्सन (52) व रॉस टेलर (47) यांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडने सहज खिशात घातला.

त्यापूर्वी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा डाव 170 धावांवर संपला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावा करण्याचे सोपे लक्ष्य होते.

बुधवारी भारताने आपल्या 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर उरलेले आठ फलंदाज केवळ 106 धावांची भर घालून तंबूत परतले. न्यूझीलंडच्या टीम साउदी, ट्रेन्ट बोल्ट व काएल जेमिसन यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण फलंदाजी उद्‌ध्वस्त केली. या सामन्यात पहिल्या व चौथ्या दिवसाचा खेळ संततधार पावसाने वाया गेला होता. मात्र, आयसीसीने सहावा राखीव दिवस ठेवल्यामुळे तसेच पावसाने ओढ दिल्यामुळे बुधवारी खेळ वेळेवर सुरू झाला.

स्वच्छ सूर्यप्रकाशात भारतीय फलंदाजी यशस्वी होईल असे चित्र दिसत होते. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेली अचूक गोलंदाजी व भारतीय फलंदाजांनी केलेली बेजबाबदार फलंदाजी हेच समीकरण पुन्हा एकदा दिसले.

साऊदी, जेमिसन व बोल्टने केलेल्या गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा डाव 73 षटकात 170 धावांवर संपला. भारताकडून ऋषभ पंतने 88 चेंडूत 41 धावांची खेळी केली. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तोदेखील बाद झाला. या संपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली.

2 बाद 64 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर भारताचे विराट कोहली (13), चेतेश्‍वर पुजारा (15) आणि अजिंक्‍य रहाणेला (15) हे प्रमुख फलंदाज अत्यंत निराशाजनक फलंदाजी करून बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंतने एकाकी किल्ला लढवला. मात्र, तो बाद झाल्यावर भारताचे शेपूट फार वळवळले नाही.

उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने 55 षटकात 5 बाद 130 धावा केल्या होत्या. उपाहारानंतर पंतसह रवींद्र जडेजाने 16 धावा केल्या. पंतने 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. बोल्टने अश्‍विनला 7 धावांवर बाद केले. न्यूझीलंडकडून टीम साउदीने 48 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. बोल्टने 3, जेमिसनने 2, तर नील वॅगनरने 1 बळी घेतला.

About Belgaum Varta

Check Also

१० व्यांदा घेतली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Spread the love  पटना : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *