बेंगळुरू : सरकारने लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्वरित लसीकरण सुरु करावे. सरकारने सीडी प्रकरण सोडून दिले तरी आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाचा पिच्छा पुरवून न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला.
यासदंर्भात हासन येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी राज्यात उदभवलेल्या कोरोना लसीच्या टंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस द्या, लहान मुले आणि युवकांसाठी नियोजनबद्ध लसीकरण अभियान राबवा, हात जोडून विनंती करतोय, सर्वाना मोफत लस द्या, लोकांचे जीव वाचवा आणि तुमच्या नावाची बदनामी टाळा असे शिवकुमार यांनी सरकारला आवाहन केले.
सरकारने सीडी प्रकरण सोडून दिले तरी काँग्रेस त्याचा पाठपुरावा करत राहील. याप्रकरणी मुख्यमंत्री एक तर गृहमंत्री दुसरेच विधान करत आहेत. सरकार रमेश जारकीहोळी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेय. मात्र आम्ही या प्रकरणी न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडू असे यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सर्वाना मोफत लस द्यावी असे आवाहन शिवकुमार यांनी यावेळी केले.