
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे होणाऱ्या पहिल्या जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटक म्हणून जेष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांना तर समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द तरुण लेखक बालाजी सुतार यांना निमंत्रित करण्याचा निर्णय आज झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. स्वाती महेश कोरी होत्या.
डॉ. राजन गवस हे साहित्याच्या क्षेत्रात नव्यानं येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला नेहमीच पाठबळ देत आले आहेत. अनेक नव्या लेखक कवींचे ते मार्गदर्शक राहिले आहेत. गडहिंग्लज परिसरातील देवदासी निर्मूलन चळवळीसह अनेक चळवळीत त्यांचा कृतिशील सहभाग राहिला आहे. साहित्य अकादमी प्राप्त ‘तणकट’ या कादंबरीबरोबरच चौंडक, भंडारभोग, कळप, धिंगाणा, ब-बळीचा या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिध्द आहेत. ‘लोकल ते ग्लोबल’ यासह त्यांचे विपुल ललित साहित्य प्रकाशित झाले आहे. मराठी साहित्यात त्यांच्या लेखनाची त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते या मातीतले साहित्यिक असल्याने त्यांनाच उदघाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीच्या सुरवातीला कॉ. संपत देसाई यांनी मागील बैठकीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत प्रा. स्वाती कोरी, प्रा. सुनील शिंत्रे, ऍड. दिग्विजय कुऱ्हाडे, प्रा. नवनाथ शिंदे, सातप्पा कांबळे, प्रा. सुभाष कोरे यांनी अनेक सूचना मांडल्या.
यावेळी जनवादी सांस्कृतिक चकवळीचे सचिव अंकुश कदम, बाळेश नाईक, महेश पेडणेकर, प्रा. शिवाजीराव होडगे, गणपतराव पाटोळे, कृष्णा भारतीय, सुरेश थरकार, कल्याणराव पुजारी, रमजान अत्तार, मधुकर जांभळे, अनिता पाटील, शीतल पाटील, योगेश सकपाळ, राहुल कदम, सुरेश दास, मयुरेश देसाई, मायकेल डिसोझा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta