नेसरी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीस अटक
तेऊरवाडी (एस के पाटील) : येथूनच जवळ असलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे एका पोल्ट्री चालकाने पोल्ट्रीचे नुकसान केल्याच्या रागातून तीन शालेय विद्यार्थ्यांना बांधून मारहाण केल्याची तक्रार नेसरी पोलिसात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील नेसरी पोलिसात अशोक शिवाजी तेऊरवाडकर (वय 38 वर्षे, व्यवसाय -शेती रा. हाडलगे. ता. गडहिंग्लज) कोल्हापूर यांनी नेसरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी की, हडलगे येथे नेसरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मायाप्पा विष्णू तेऊरवाडकर यांच्या मालकीची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री गावातीलच विजय सुभाष कुंभार (वय ३० वर्षे) याना भाडेतत्वावर चालवण्यास दिली आहे. या पोल्ट्रीच्या पाण्याच्या टाकीमध्ये फिर्यादी अशोक तेऊरवाडकर यांचा १२ वर्षाचा मूलगा, पुतण्या वय १३ वर्ष व गावातील आणखी एक १२ वर्षाचा मुलगा यानी पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकून व पोल्ट्रीमध्ये पाणी सांडून नुकसान केल्याच्या कारणावरून या मुलांचे हात-पाय दोरीने बांधून त्यांना लाकडी पट्टीने व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यानुसार नेसरी पोलिसात गु. र. क्र. 62 /2024, भादविस कलम 324, 323, 342 सह बाल न्याय बालकाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार आरोपी विजय कुंभार याना नेसरी पोलिसानी ताब्यात घेतले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta