बेळगाव : मागील चार दिवसांपासून घरात अतिशय आजारी असलेल्या एका व्यक्तीला पोलिस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले
बेळगाव येथील, टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील शिवाजी कॉलनीत राहणारे विश्वनाथ गायचरे (वय ५६) हे गेल्या चार दिवसांपासून आपल्या भाड्याच्या घरातून बाहेर आले नव्हते. ही व्यक्ती घरीच बेशुद्ध पडली होती. घरात कोणी नव्हते आणि कोणालाही याबद्दल माहिती नव्हते. प्रसाद उचगावकर आणि मोहन घाटगे या शेजार्यांनी सामाजिक कार्यकर्ते हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर आणि संतोष दरेकर यांना तातडीने याबद्दल माहिती दिली. त्यानंतर टिळकवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होऊन आणि आतून लॉक असलेला दरवाजा उघडला. त्यानंतर त्या व्यक्तीला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती देताना सुरेंद्र अनगोळकर यांनी सांगितले कि, हे चार दिवसांपासून घरात आजारी होते. म्हणून आम्ही पोलिस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. जर कोणालाही आरोग्य समस्येमुळे त्रास होत असेल तर कृपया आम्हाला कळवा.
यावेळी अनिल अष्टेकर, रोहित जांभळे, भारत नागरोळी, निलेश पाटील, श्रीनिवास साके, राहुल नायक उपस्थित होते.