खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर
बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेळगाव ते अनमोडपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तसेच खानापूर ते बेळगावपर्यंतचा रस्ता वेगाने काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे. मात्र खानापूर ते रामनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यापासूनच अतिशय संथगतीने सुरू होते अशातच काही महिन्यांपूर्वी वनखात्याने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे कामाला पूर्णपणे ब्रेक आला असून दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वन खात्याच्या भूमिकेमुळे काम सुरू करण्यास अडचण येत असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी चिखल निर्माण झाला असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी जमीन ढासळत असल्याने रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून काम करावे लागते. सध्याच्या कोरोनाच्या महामारमध्येही रस्ता व्यवस्थित नसल्याने तालुक्यातील संबंधित गावांमध्ये रुग्णवाहिका जाण्यास अडचण निर्माण होत आहे. याकरिता रस्ता करण्यासाठी येत असलेल्या अडचणी आपण दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून निवेदनासोबत रस्त्याच्या दुरावस्थेबाबतचे फोटो व चित्रीकरण ही केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना पाठवण्यात आले आहे.
सदर रस्त्याचे निवेदन पाठवताना खानापूर युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षरित्या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करून फोटो व चित्रीकरण केले.
यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, सोशल मीडियाचे ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील हजर होते.