ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

खानापूर : अन्यायाने कर्नाटकात डांबलेला सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधुरेच राहील. महाभारतात कौरवांनी पांडवांना एक इंचही जमीन न देण्याची भाषा केली होती. आता कर्नाटक देखील तीच भाषा वापरतो. कर्नाटक सरकार कौरवांचा वारसा चालवत आहेत का? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माचीगड ता. खानापूर येथील श्री सुब्रमण्यम साहित्य आकादमीतर्फे रविवार दि. 1 जानेवारी रोजी आयोजित 26 वे मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले की, संस्कृतीचा उत्सव, साहित्यांची पेरणी करण्यासाठी सहजीवन आणि सहआस्तित्व सुखसंपन्न व्हावे यासाठी साहित्य संमेलन असते. समाजहिताचे विचार मांडणारा लेखक खऱ्या अर्थाने समाजासाठी नायक ठरतो. ख्रिश्चनातील समाजसेवा, मुस्लिममधील प्रामाणिकता, हिंदूंची उदारता, बौद्धांची करुणा समाजाला घडविण्याचे काम करते. नव्या हिटलरशाहीचा नाश करणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे. संविधान निधर्मी असून त्याचे पावित्र्य राखण्यासाठी संविधान साक्षर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांकडे डोळसपणे पाहावे. येथील मराठी माणूस मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणाने लढतो आहे, धडपडतो आहे. संस्कृती पेरण्याचे ती रुजविण्याचे काम करत समाजाच्या प्रत्येक घटकाला विचारात घेत मानसन्मान देण्याची माचीगडची ही संस्कृती सांस्कृतिक लोकशाही जपण्याचे काम करते, असे गौरवोद्गार डॉ. श्रीपाद सबनीस यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सुरुवातीला अकादमीचे सचिव एम. पी. गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संजय वाटुपकर यांनी प्रास्ताविक केले. कै. उदयसिंह सरदेसाई साहित्य नगरीचे उद्घाटन निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, रामचंद्र शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, धनश्री सरदेसाई, पीटर डिसोझा, अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कवी संजय वाटुपकर यांच्या ‘थवे माणसांचे’ या काव्यसंग्रहांचे व सुब्रमण्यम साहित्य अकादमीच्या ‘प्रगल्भ’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात नवोदित कवींच्या काव्य वाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले तर खास उपस्थितांच्या आग्रहास्तव संजय वाटुपकर यांच्या ‘आईचा चष्मा’ या कवितेचे काव्यवाचन करण्यात आले.

चौथ्या सत्रात जादूगार प्रेमानंद पाटील यांच्या जादूच्या प्रयोगाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले. मानवी शरीराचे दोन भाग करणे, माईंड रायडिंग करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, भुताचा डान्स, रुमाल कट करणे, मेणबत्ती पेटविणे, हवेतून विभूती व तीर्थ आणणे, व्यासपीठावरून अदृश्य होऊन प्रेक्षकांत प्रकटणे आदी लोकप्रिय प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
Belgaum Varta Belgaum Varta