अमर बागेवाडी : डॉ. प्रभाकर कोरे यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता.५) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
के. एल. ई. विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय, वैद्यकीय संशोधन केंद्र , के. एल. ई. संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालय, के. एल. ई. सोसायटीच्या अन्य संस्था, निपाणीतील रोटरी क्लब, महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बागेवाडी म्हणाले, या शिबिरात के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील वैद्यकीय, अस्थिव्यंग, सांधेदुखी आणि सांधे पुनर्वसन, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक आणि घसा, त्वचारोग, फुफ्फुस, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, न्यूरोसर्जरी, मूत्राशय शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया इंटरव्हेस्टोन न्यूरोरेडियोलॉजी, गॅस्ट्रोलॉजी आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील तज्ञांकडून मोफत तपासणी करून माहिती देणार आहेत. दातांच्या आजाराची मोफत तपासणी करून औषधे मोफत दिली जाणार आहेत. तरी शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
शिबिरात रक्त तपासणी, साखर चाचणी केले जाणार आहे. के. एल. ई. होमिओपॅथिक महाविद्यालयातील तसेच बी. एम. के. आयुर्वेदिक महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व आयुर्वेदिक औषधे मोफत दिली जाणार आहेत.
आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजना बी. पी. एल. कार्डधारकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य – योजना, वैद्यकीय खर्च परत योजना, आरोग्य लाभ योजना, सरकारी कर्मचारी, शिक्षक, महसूल विभाग, पोलीस विभागाचे कर्मचारी, खाजगी विमा योजना, स्टार, बजाज, रिलायन्स हेल्थकेअर आरोग्य कार्ड योजनेच्या अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट सर्जरी केली केली जाणार आहे.
शरीरासाठी येताना मास्क आणि सॅनिटायझरचा सक्तीने वापर करून सामाजिक अंतर राखून शिबिर यशस्वी होणार आहे.कोणताही रुग्ण कोणत्याही शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्यास त्या रुग्णांना या योजनांतर्गत रुग्णालयात घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णांनी सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड आणणे आवश्यक आहे. या शिबिरात ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय मंडळी रुग्णांची तपासणी करणार आहेत. आतापर्यंत ६ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. यावेळी जी. आय. बागेवाडी महाविद्यालयातील एनएसएस आणि एनसीसीचे २०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.
यावेळी महादेव गल्ली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील पाटील, महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील, आशिष कुरबेट्टी, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, प्राचार्य एम. एम. हुरळी, एच. डी. चिकमठ, प्रा. व्ही. बी धारवाड उपस्थित होते. प्रा.व्ही. बी धारवाड यांनी आभार मानले.