तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे. सरकारने हा रिंगरोड रद्द करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शहरातील वाहनाची कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड व्यतिरिक्त फ्लाय ओव्हर करून ही समस्या संपवता येते, वाढत्या वाहनकोंडीमुळे अनेक शहरांमध्ये आज अनेक फ्लाय ओव्हर करून या समस्येवर मात करण्यात आली आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन हा रिंगरोड रद्द करावा नाहीतर शेतकरी अनेक आंदोलने करून हा रिंगरोड रद्द केल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना किणेकर म्हणाले की, बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनात तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येतात त्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा रिंगरोड रद्द करण्यासाठी एकाही आमदाराने वाक्य न काढल्यामुळे हा शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. ‘शेती टिकेल तर देश टिकेल’ या वाक्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने आजपर्यंत शेतकऱ्यांवर झालेल्या अनेक अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांचा अन्याय दूर केला आहे. तेव्हा हाही रिंगरोडचा अन्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती व शेतकरी स्वस्त बसणार नाहीत.
सोमवार दिनांक 2 रोजी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर,
माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, मनोज पावशे, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. एम. जी. पाटील होते.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने भागोजी पाटील, मनोहर संताजी, पुंडलिक पावशे, अनिल पाटील, रामचंद्र मोदगेकर, विलास घाडी, प्रकाश अष्टेकर, ऍड. सुधीर चव्हाण, सरस्वती पाटील, मनोज पावशे,शिवाजी सुंठकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी ऍड. एम. जी. पाटील यांनी अनेक ठरावाचे वाचन करून आभार व्यक्त केले.