चंदीगड : चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी (दि. २) घडलेल्या या घटनेने पोलिसांनी आजूबाजूचा सर्व परिसर सील केला.
बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घर आणि हेलिपॅडजवळ आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे घरही याच परिसरात आहे. कंसल टी पॉइंट ते नया गाव दरम्यान असलेल्या आंब्याच्या बागेत हा बॉम्ब सापडला. बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून हेलिपॅडचे अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरांमधील अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे.
आपत्ती विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी या घटनेची सर्व माहिती दिली. या घटनेने सध्या या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.