खानापूर : समितीच्या प्रवाहात मराठी भाषिकांना पुन्हा आणण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्न आणि मराठीसंदर्भात जनजागृती मोहीम राबविली. निवडणूक जवळ आली कि विविध प्रकारची आमिषे दाखवून राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिकांना समितीपासून तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी मराठी भाषिकांनी सजग राहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले.
सोमवारी खानापूर शहरातून पत्रके वाटून सीमाप्रश्न आणि मराठीची जागृती करण्यात आली. सीमा प्रश्नाच्या निर्णायक क्षणी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येण्यासाठी मराठी भाषिकांना भावनिक साद घालणारे पत्रक घरोघरी वितरित करण्यात आले. याचप्रमाणे आज नंदगड येथे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. शहर आणि मध्यवर्ती समितीने संबंधित विभागाच्या उपाध्यक्षांवर जनजागृती दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानुसार मध्यवर्ती म. ए. समितीने दिलेली ‘चलो मुंबई ‘ची हाक यशस्वी करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांनी १२ फेब्रुवारीपूर्वी आपली नावे सचिव सिताराम बेडरे यांच्याकडे नोंद करावीत, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रुक्माण्णा झुंजवाडकर, प्रकाश चव्हाण, सिताराम बेडरे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta