खानापूर : कणकुंबी येथे यंदा चौदा वर्षांनी भरलेल्या कणकुंबी, कोदाळी, चिगुळे गुळंब, कळसगादे केंद्र विजघर येथील श्री माऊली देवी यात्रा उत्सवाची बुधवारी भक्ती भावात सांगता झाली. कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली देवीच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होत असतो. गुरु ग्रह मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी कणकुंबी व चिगुळे येथील माऊली देवीच्या मंदिराला लागून असलेले जलकुंडातील पाणी पांढरे शुभ्र होते. याला गंगा भागीरथी अवतरली असे म्हटले जाते. हा योग 2021 मध्ये आला होता. परंतु कोरोना महामारीमुळे दोन वर्षे सदर यात्रोत्सव सोहळा पुढे लोटला होता.
त्यानंतर यावर्षी 14 वर्षांनी ही माऊली देवींच्या भेटीचा सोहळा आठ ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. बुधवारी विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांसह य यात्रोत्सवाची सांगता झाली. यात्रा उत्सवाच्या सांगता सोहळ्यात महाभिषेक, आरती, नैवेद्य, विविध धार्मिक विधी, सामुदायिक प्रार्थना, महासंकल्प मानपान आणि त्यानंतर माऊली देवीच्या पालकांची धुळाच्या वरंड्याकडे मिरवणूक निघाली. त्या ठिकाणी धार्मिक विधी व मानपान झाल्यानंतर, चिगुळे, कोदाळी येथील माऊली देवीच्या पालख्या व चंदगड येथील श्री रवळनाथ देवाची पालखी आपापल्या गावाकडे रवाना झाले.
Belgaum Varta Belgaum Varta