Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर म. ए. समितीचे सात “शिलेदार”

Spread the love

 

खानापूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. खानापूर समितीला लागलेले बेकीचे ग्रहण देखील सुटले आहे त्यामुळे म. ए. समितीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा होणारी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार व महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा डौलाने फडकणार यात शंकाच नाही. बेकीच्या वणव्यात बेचिराख झालेली म. ए. समिती पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार हे नक्की.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म. ए. समितीने 10 फेब्रुवारी पूर्वी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. 51 हजार रुपये देणगी स्वरूपात देऊन खानापूर तालुक्यातील सात शिलेदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे अर्ज दाखल केले आहेत. “वेडात मराठे वीर दौडले सात” ही काव्यपंक्ती सार्थ ठरावी असे दिग्गज यावेळी रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे धाबे दणाणले आहेत.

आबासाहेब दळवी हे म. ए. समितीमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आबासाहेब दळवी हे कुशल संघटक व उत्तम मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिक्षकी सेवेत असताना देखील खानापूर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविल्या आहेत तर खानापूर तालुका सरकारी नोकर संघटनेचे राज्यपरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर ते पूर्ण वेळ सीमा लढ्यात सक्रिय आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सरचिटणीस पदाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच ते सध्या खानापूर तालुका को-ऑप. सोसायटीचे चेअरमन आहेत. नुकत्याच झालेल्या एकीची प्रक्रियेत आबासाहेब दळवी यांचा मोलाचा वाटा आहे.

त्याचबरोबर गर्लगुंजी गावचे सुपुत्र गोपाळराव मुरारी पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीत इच्छुक आहेत. त्यांनी गर्लगुंजी गावाचे ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून सेवा बजावली आहे. त्याचबरोबर विविध संघ संघटनांतून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन तसेच केपीटीसीएलचे संचालक व चेअरमन म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. तसेच त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सीमालढ्यात आपले योगदान दिले आहे. मध्यवर्ती समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

पांडुरंग सावंत गर्लगुंजी यांनी देखील आपला अर्ज म. ए. समितीकडे सुपूर्द केला आहे. पांडुरंग सावंत यांनी माजी ता. पं. सदस्य म्हणून काम केले आहे. पांडुरंग सावंत यांना त्यावेळी समितीने उमेदवारी नाकारली होती मात्र ते अपक्ष म्हणून लढले व बहुमताने निवडून आले. त्यानंतर देखील ते महाराष्ट्र एकीकरण समितीशी प्रामाणिक राहिले. सध्या ते केपीटीसीएल व मार्केटिंग सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

जळगा गावचे सुपुत्र भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील हे देखील म. ए. समितीतून उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांनी यापूर्वी काँग्रेस व शिवसेना पक्षातून आपले नशीब आजमावले आहे. सध्या ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सक्रिय आहेत.

मागील निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून विलास बेळगावकर यांनी विधानसभा निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांना 17851 मते मिळाली होती. अरविंद पाटील यांच्या बंडखोरीचा फटका समितीला बसला होता. माजी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. विलास बेळगावकर यांनी खानापूर तालुक्यात पाहिल्यांदा को-ऑप. सोसायटी स्थापन केली. त्यांनी खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. यावेळी पुन्हा ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

खैरवाड गावचे सीमातपस्वी रुक्माणा झुंजवाडकर यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केलेले व जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेल्या रुक्माणा झुंजवाडकर हे देखील उमेदवारीचे दावेदार आहेत.

त्याचबरोबर सध्या नव्याने सक्रिय झालेले निरंजन सरदेसाई हे देखील समितीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. ज्येष्ठ विचारवंत कै. उदयसिंह सरदेसाई यांचे चिरंजीव व माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचे पुतणे असणारे निरंजन सरदेसाई हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी झाल्यामुळे समितीपासून दुरावलेले मराठी भाषिक समितीच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहे. त्यामुळे चळवळीला बळ प्राप्त झाले आहे. कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. तालुक्यातील जनतेतील संभ्रम दूर करून सर्व मराठी भाषिकांना समितीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. एकंदर परिस्थिती पाहता खानापूर समितीमध्ये “एकीचे बळ देते फळ”असेच वाटते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *