खानापूर : वेगवेगळ्या क्षेत्रात समाजासाठी योगदान देणाऱ्या साधकांचा सत्कार करणे हे विधायक कार्य आहे. असे सत्कार कर्तृत्ववान व्यक्तींना समाजासाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे खानापूर तालुका मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने कुस्तीगीर संघटना आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येत असल्याचे चेअरमन आबासाहेब दळवी यांनी सांगितले.
येथील खानापूर तालुका मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे नूतन अध्यक्ष तानाजी कदम, स्वागताध्यक्ष मोईद्दिन दावणगिरी, साहित्यिक प्रल्हाद मादार आणि पत्रकार वासुदेव चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आबासाहेब दळवी होते.
यावेळी माजी ता. पं. सभापती सयाजी पाटील यांनी, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करून विधायकतेला वाव देणे काळाची गरज असल्याचे सांगितले. सोसायटीचे संचालक तानाजी कदम यांची खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच माजी नगरसेवक मोईदीन दावणगिरी यांची कुस्तीगीर संघटनेच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल. श्रीफळ आणि हार अर्पण करून सत्कार करण्यात आला. तसेच माचीगड येथील 26 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात आदर्श पत्रकाराचा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेल्या दैनिक पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले यांचा तसेच कादंबरीकार व लेखक प्रल्हाद मादार यांना पोलीस वर्ल्ड या वृत्तसमूहाच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक एम. टी. राठोड, डॉ. वैभव भालकेकर, रामा खांबले, रामचंद्र पाटील, नारायण घाडी, पांडुरंग गुरव आदी उपस्थित होते.