खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मराठी शाळातील आठवीचे वर्ग असलेल्या टीजीटी बीएससी बीएड पदवी घेतलेल्या मराठी शिक्षकांची अतिरिक्त शिक्षक म्हणून चक्क कन्नड माध्यमाच्या हायस्कूलमध्ये बदली करून मराठी शिक्षकासह मराठी भाषेवर मोठा अन्याय करण्यात आल्याने मराठी शाळा टिकवून ठेवणे कठीण होत आहे.
खानापूर तालुक्यातील तीन उच्च प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग सुरू करून बीएससी बीएड शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. मात्र आठवीच्या वर्गाला विद्यार्थी नाहीत असे कारण दाखवून चक्क मराठी माध्यमाच्या बीएससी बीएड शिक्षकाची नेमणूक आता तालुक्याबाहेरील कन्नड माध्यमाच्या शाळांतून केली आहे.
याकडे शिक्षण खात्याने तसेच मराठी भाषेच्या लोकप्रतिनिधी डोळे उघडे ठेवून न्यायाबद्दल विचार करणे गरजेचे आहे. ज्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांना कन्नड भाषेचा गंध नाही. अशा शिक्षकाना वेठीस धरून चक्क कन्नड माध्यमाच्या हायस्कूलमध्ये बदली करणे म्हणजे केवळ मराठी भाषेवर अन्याय केल्यासारखे आहे. या अशावेळी मराठी शिक्षकानी करायचे काय?
असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मराठी भाषिकांना जाणूनबुजून कसा त्रास देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तेव्हा संबंधित शिक्षण खात्याने तसेच मराठी भाषिक लोक प्रतिनिधीनी मराठी टीजीटी शिक्षकाना मराठी शाळावर नेमणूक करावी व त्याची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.