खानापूर : खानापूर- बेळगाव महामार्गावर गणेबैल येथे उद्या मंगळवार दिनांक 11 जुलैपासून टोल वसुली करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेबैल ते झाडशहापूर जवळपास 12 किलोमीटरचा रस्ता अजून पूर्णत्वास आलेला नाही. काही ठिकाणचे संपर्क रस्ते तसेच हत्तरगुंजी नजीक पूल बांधण्याचे काम देखील अर्धवट अवस्थेत आहे. असे असताना टोल वसुलीची घाई का करण्यात येते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव- गोवा- पणजी हा महामार्ग नव्याने निर्माण करण्याची घोषणा करून बेळगाव -गोवा रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता पीपीसी या तत्त्वावर बनवण्यात आला असल्याने कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम करून घेण्यात येते आणि टोल वसुलीचे काम हे महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्ता पूर्ण होण्याअगोदर टोल वसुलीची इतकी घाई का असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच खानापूरहून बेळगावला शिक्षणासाठी त्याचबरोबर व्यवसायानिमित्त बरेच लोक ये-जा करीत असतात त्यामुळे स्थानिक लोकांना टोलपासून सूट देणे देखील गरजेचे आहे.
बेळगाव- खानापूर या रस्त्याचे काम अशोक बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले आहे. बेळगाव ते होलकर पर्यंतच्या 30 किलोमीटर रस्त्याचे काम या कंपनीला देण्यात आले होते मात्र अद्यापही झाडशहापुर ते मच्छे येथे काम अर्धवट अवस्थेत असल्याने खानापूर ते बेळगाव 25 किलोमीटरच्या अंतराचे फक्त 14 किलोमीटरचा अंतर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर टोला आकारणी करणे चुकीचे आहे. महानगर प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे खानापूर परिसरातील नागरिकांसह प्रवासी व वाहनधारकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta