खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे.
गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय झाले आहेत. त्यामुळे बससेवा ठप्प झाली आहे.
खानापूर- बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून हल्याळ मार्गे तसेच बिडी, कित्तूर वाहतुक मोठ्या प्रमाणात असते. खानापूर शहरापासुन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.
या रस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात होण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खानापूर- बिडी रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर दुरूस्ती करून रस्ता वाहतुकीला सुरळीत करावा, अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतुन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta