बेळगाव : मराठी माध्यमांच्या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवारी मनतूर्गा, असोगा व रुमेवाडी गावातील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मनतूर्गा येथील शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद मादार होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बेळगाव युवा समितीचे सर चिटणीस श्रीकांत कदम यांनी मराठी शाळा मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून बेळगाव आणि परिसरातील मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात असून मराठी संस्कृती टिकण्यासाठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहूया असे मत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक ओ एन मादार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी युवा समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, संतोष कृष्णाचे, मिलिंद देसाई, प्रतीक पाटील, आनंद पाटील, सह शिक्षक मारुती देवकरी, आर वाय अल्लवकर उपस्थित होते.
असोगा येथील मराठी शाळेत साहित्य वितरण करताना आबासाहेब दळवी यांच्या सह शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश सावंत, सह शिक्षक एस डी भालकेकर, एस आर देसाई, एम एन कम्मार परशराम बिर्जे, दिलिप पाटील, परशराम नंदगडकर, शंकर सुळकर, शिल्पा पाटील आदि उपस्थित होते.