खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नेहमीच रहदारीची समस्या चर्चेत असते. अशीच चर्चा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रहदारीची समस्या होत असल्याची चर्चा सर्व थरातुन होत आहे.
खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील असलेल्या जागेवर चहाच्या टपरी चालु होत्या. त्या बंद करून त्या जागेवर तहसील कार्यालयाकडून तारेचे कुंपण घातले असल्याने तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरच दुचाकी वाहने लावल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या अवजड वाहनाना तसेच प्रवाशाना ये-जा करताना अडथळा होत आहे.
महत्वाचे म्हणजे समोरच सरकारी दवाखाना असल्याने येथे वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ऍम्ब्युलन्स सारख्या वाहनाना दवाखान्यात वेळेत जाण्यास खूपच अडचण होत आहे.
तेव्हा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील तारेचे कुंपण हे वाहतुकीला अडचणीचे होत आहे. ते कुंपण काढून वाहतुकीला मार्ग मोकळा करावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.