केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून निवेदन सादर
खानापूर : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गावरील शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्ते मंजूर करण्याबाबत
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन निवेदन सादर आले.
यावेळी नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत बेळगाव- पणजी महामार्गावरील शेत जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना अवॉर्ड कॉपी तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम तात्काळ जमा करावी, केंद्रीय रस्ते योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक गावांना रस्ते मंजूर करावेत तसेच महामार्ग लगतच्या गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच खानापूर शहरातून जाणारा जुना महामार्ग राजा टाईल्स फॅक्टरी ते करंबळ या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केली.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर, प्रमोद कोचेरी, अभिजीत चांदोलकर यांच्याशी राजकीय चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव वर आपले विशेष प्रेम आहे. बेळगावची आपल्याला संपूर्ण माहिती आहे त्यामुळे बेळगाव भागातील समस्यांकडे आपण जातीने लक्ष देऊ तेथील समस्या सोडविण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार श्री. अनंत कुमार हेगडे, खासदार इराण्णा कडाडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व भाजपा युवा नेते अभिजित चांदोरकर उपस्थित होते.