खानापूर : आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आपल्याला मनुष्य म्हणून जन्म मिळाला आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उत्तम माणूस म्हणून जगण्यासाठी चांगले कार्य हाती घ्या. अलिकडच्या विज्ञान युगात मोबाईल सारख्या साधनाचा अतिरेक वाढला आहे. त्याचा परिणाम आजच्या विद्यार्थी वर्गाच्या जीवनावर होत आहे. विद्यार्थी वर्गाने मोबाईलच्या आहारी न जाता वेळेचे भान ठेवून आयुष्य जगा.
अलिकडच्या काळात माणसाला आयुष्य ७५ वर्षे म्हणजे खूप झाली. तेव्हा कमी वर्षात चांगले कार्य करा. समाज तुमचा आदर करील. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले ध्येय ठेवून यश संपादन करा, असे आवाहन आर पी डी काॅलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. संध्या देशपांडे यांनी सोमवारी शिवस्मारक व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत बी. बी. पाटील यांनी केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्तासह उत्तीर्ण झालेल्या गुणी विद्यार्थ्यांचा प्रमाण पत्र, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला शिवस्मारक ट्रस्टचे संचालक, खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार बी. बी. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta