खानापूर : खैरवाड ता.खानापूर येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा “ज्ञानवर्धिनी जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमाकांत पाटील यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात १७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला, त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खैरवाड येथे झाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातील शाळेतच ते शिक्षक म्हणून रुजू झाले, नंतर भुत्तेवाडी, कसबा नंदगड, हलशी आशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली, त्यांच्या उत्कृष्ट शिक्षकी सेवेबद्दल २००३ साली शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर ४० वर्षांच्या प्रतिर्घ सेवेनंतर ते ३० सप्टेंबर २००५ रोजी निवृत्त झाले. त्यांनी आपल्या शिक्षकी जीवनात अनेक विद्यार्थी घडवले, त्यापैकी काहीजण इंजिनिअर तर काहीजण डॉक्टर बनले. अनेकजण नोकरी व्यवसायात उच्चपदावर आहेत. काही उद्योजक बनले, त्यांनी निवृत्ती नंतरही विविध संस्थांवर कार्यरत राहून समाजसेवा घडवली. गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, या त्यांच्या निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवेची ज्ञावर्धिनीचे अध्यक्ष पीटर डिसोझा यांनी दखल घेत यावर्षीचा त्यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.