खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने पुढे जाणे गरजेचे असून प्रत्येकाने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी देखील मावळा बनून पुढे यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी देसाई यांनी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करुन आपल्याला आदर्श घालून दिला आहे. त्यानुसार प्रत्येकाने वाटचाल करणे गरजेचे आहे. आज प्रत्येक गावात शिवजयंती साजरी होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे मात्र फक्त जयंती साजरी करुन शांत न राहता युवकांनी गड किल्ल्याना भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्यावी, असे मत व्यक्त केले.
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक करताना समितीतर्फे येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत छत्रपती शिवाजी महाराजांपासुन प्रेरणा घेत आपण कार्यरत राहूया असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुका समितीचे खजिनदार संजीव पाटील, बाळासाहेब शेलार, ऍड अरुण सरदेसाई, राजाराम देसाई, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.