खानापूर : खानापूर शहरातील मऱ्यामा मंदिर नजीक, हलकर्णी क्रॉसजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आपल्या पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडकून दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने पाय चाकात सापडून एक जण गंभीर जखमी झाला होता. लागलीच त्याला खानापूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून तात्काळ बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर अपघातात आणखी एक युवक व महिला किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विद्यानगर खानापूर येथील संजू मल्लापा सत्यनाईक (वय 36) हे केए 22 एचसी 3227 क्रमांकाच्या होंडा शाईनवरून खानापूर- बेळगाव रस्त्यावर बेळगावच्या दिशेने जात असताना माऱ्यामा मंदिरानजीक असलेल्या हलकर्णी क्रॉसजवळ (केए 22-8247) या ट्रकला ओव्हरेटेक करण्याच्या प्रयत्नात असताना पुढे चाललेल्या तुकाराम सुतार यांच्या दुचाकीला (केए 22-एचए 4806) धडक दिल्याने, दुचाकी चालक तुकाराम सतीश सुतार यांच्या पत्नी सारिका तुकाराम सुतार, या खाली पडून किरकोळ जखमी झाल्या. तर संजू मल्लाप्पा सत्यनाईक यांची दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजुस आढळल्याने संजू मल्लाप्पा सत्यनाईक ट्रकच्या पाठीमागील चाकात पाय सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ
खानापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु संजू सत्यनाईक हा गंभीर जखमी झाला असल्याने, त्याला प्राथमिक उपचार करून बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संजू सत्यनाईक याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.