जांबोटी विद्यालयात सन 1971च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
खानापूर : शाळेची घंटा वाजली, प्रार्थना -राष्ट्रगीत झाले. फक्कड पांढरे झालेले केस तर कुणाचे टक्कल पडून विमानतळ झालेले, नजर अंधुक झाल्याने बहुतेकांच्या डोळ्यावर चष्मा, तर कुणी तब्येतीला जपत मंद चालीने वर्गात प्रवेश करत. असे वयाच्या पासष्ट सत्तरीकडे झुकलेले विद्यार्थी वर्गात बसले. वयाची पंचाण्णव पार करून शंभरीकडे चाललेले त्यांचे गुरु, पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा, डोकीचे व दाढीचे पांढरे झालेले केस. पण छाती पुढे करून आभाळ पेलण्याचा तोच रुबाब. 45 मिनिटाचा एक तास न थकता घेतला आणि पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा केला. सर्व विद्यार्थी भारावून गेले.
प्रसंग होता जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या सन 1971 सालच्या पहिल्या तुकडीचा स्नेहमेळावा आणि ते शिक्षक होते त्या काळातले मुख्याध्यापक, विश्व भारत सेवा समितीचे संस्थापक, साक्षात गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळी. पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर त्या वर्गातील विद्यार्थी पुन्हा एकत्रित आले. कुणी सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर, कुणी निवृत्त मुख्याध्यापक, कोणी निवृत्त शिक्षक तर कुणी टपाल खात्यातून सेवा निवृत्त. कोणाचा स्वतःचा उद्योग तर कुणी अन्नदाता शेतकरी. कधी झाडाच्या सावलीत तर कधी मंदिर चर्च यांच्या कट्ट्यावर अन कधी स्वतः तयार केलेल्या झोपडीत सन 1971 साली या विद्यालयाची सुरुवात झाली त्याचे हे सर्व साक्षीदार होते. म्हणजे विद्यालयाचे संस्थापक विद्यार्थी होय. त्यावेळीचा त्यांचा वर्ग झाडाच्या सावलीत भरायचा आज तो डिजिटल क्लासरूममध्ये होता, त्यांना इंग्रजी विषय शिकविणारे नंदिहळी सर, गणित विज्ञान शिकविणारे नागोजी सडेकर सर हे सोबत होते. आज 50 वर्षानंतर विद्यालयाची सुसज्ज इमारत आणि इतर सुखसोयी पाहून ते भारावले आणि त्यांची विद्यालया प्रतीची मायेची विन अधिकच दृढ झाली. त्या काळात त्या जुन्या आठवणीत त्यांनी पूर्ण दिवस विद्यालय परिसरात घालवला. हे पाहून आजचे शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा या भावनिक प्रसंगाने भारावले.
दुसऱ्या सत्रात विद्यालयाच्या वतीने या सर्वांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळी होते. सुरुवातीला या तुकडीचे दिवंगत साथीदार कै. प्रदीप दामोदर पोतदार, कै. शंकर दर्याप्पा होंडडकट्टी, कै. अरुण काशिनाथ डांगे, कै. रामचंद्र कृष्णा देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तत्कालीन शिक्षक नागोजी सडेकर, निवृत्त प्राचार्य सुरेंद्र देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णाजी देसाई आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन झाले. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरुजनांचा सन्मान केला. निवृत्त पोलिस निरीक्षक रामराव देसाई, दत्ताराम राजाराम सुतार, मुख्याध्यापक विजय साखळकर, निवृत्त शिक्षक मारुती सखाराम साबळे या माजी विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले. जयराम देसाई, सुरेंद्र देसाई यांची भाषणे झाली. व्यासपीठावर टपाल खात्याचे निवृत्त अधिकारी मनोहर देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण दळवी, पांडुरंग साबळे, दत्तात्रय कोटीभास्कर, परबतराव देसाई, देवाप्पा मळवकर हे होते. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी एस. एम. साखळकर व दत्ताराम सुतार यांनी विशेष प्रयत्न केले. सहशिक्षक तुकाराम सडेकर व महेश साबळे यांनी सूत्रसंचालन केले आणि दिनकर पाटील यांनी आभार मानले.