खानापूर : बेळगाव, खानापुर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा 15 दिवसात भरती न केल्यास शाळांना टाळे
लावण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यातील प्रत्येक मराठी बहुभाषिक गावात युवा समितीची शाखा काढून समिती बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
खानापूर तालुका युवा समितीची बैठक रविवारी पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी सचिव सदानंद पाटील होते. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी लोंढा ते खानापूर रस्त्याच्या कामाची डागडुजी करावी अशी मागणी करून देखील अजूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी व्यापक उपक्रम हाती घेतला जाणार आहे. तसेच रस्त्याचे काम न झाल्यामुळे ज्या गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे त्या गावातील लोकांना एकत्र करून त्यावर आवाज उठवून रस्त्याचे काम करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती दिली.
सचिव पाटील यांनी, खानापूर तालुक्यातील युवा वर्ग एकवटला आहे. त्या युवकांना एकत्र करून गावागावात युवा समितीची शाखा काढणार असून अनेक वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली फोटो लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच युवकांची संघटना मजबूत करून सीमा प्रश्नाबरोबरच मराठी भाषिकांना एकत्र करून विविध प्रकारच्या समस्या सोडविल्या जातील, असे मत व्यक्त केले.
सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची भेट घेण्याचा निर्णयही युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीला कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, मारुती गुरव, राहुल पाटील, परशराम गोरे, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, ज्ञानेश्वर सनदी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.