खानापूर : खानापूर पीएलडी बँकेच्या आज झालेल्या बैठकीत, मुरलीधर गणपतराव पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून बँकेच्या चेअरमन पदाची माळ तिसऱ्यांदा, त्यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे पीएलडी बँकेच्या चेअरमन पदाची हॅट्रिक त्यांनी साधली आहे. तर उपाध्यक्षपदी आमटे गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कसर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुरलीधर पाटील यांनी या अगोदर दोन वेळा पीएलडी बँकेच्या चेअरमन पदाची कारकीर्द व्यवस्थित सांभाळली असून त्यांच्या कारकिर्दीत बँकेने उत्तमरित्या प्रगती साधली आहे. पुन्हा एकदा त्यांची पीएलडी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे व उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांचे अभिनंदन होत आहे.
मुरलीधर पाटील व लक्ष्मण कसर्लेकर यांची निवड जाहीर होताच, खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे व इतर नेतेमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.
निवडीनंतर बोलताना मुरलीधर पाटील म्हणाले की, सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून बँकेच्या अध्यक्षपदी माझी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
Belgaum Varta Belgaum Varta