खानापूर : कणकुंबी, ता. खानापूर – सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कणकुंबी (ता. खानापूर) ही शाळा आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने 15 एप्रिल 2025 मंगळवार रोजी एक भव्य कार्यक्रम आयोजित करीत आहे. या शाळेची स्थापना 1895 साली झाली असून, या संस्थेने 129 वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली आहे.
या सोहळ्यासाठी खासदार, आमदार, मान्यवर अधिकारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शाळेचे सध्या कार्यरत असलेले सर्व शिक्षक आणि माजी शिक्षक यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. त्यामध्ये शाळेचे रंगकाम, नवीन स्टेज, प्रवेशद्वार उभारणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील ही एकमेव शाळा आहे, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. हेही माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे शक्य झाले आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक, एसडीएमसी कमिटी व माजी विद्यार्थी संघटना यांनी केले आहे.