खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली आहे. या स्थलांतर प्रक्रियेला आता अधिकृत मान्यता मिळाली असून वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्या शनिवारी (दि. १७) हेमाडगा येथे प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत.
बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भातील माहिती देताना खंड्रे म्हणाले, “भीमगड अभयारण्यातील तळेवाडीतील गवळीवाड्यावर राहणाऱ्या कुटुंबांवर वन्यप्राण्यांचा सतत धोका होता. त्यांनी स्वेच्छेने जंगलातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील. घर सोडल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर उर्वरित ५ लाख रुपये दिले जातील.”
जीवन सुधारण्यासाठी मदत
या निधीतून त्या कुटुंबांना नवीन घरे उभारता येणार असून, त्यांच्या जीवनात सुधारणा होण्याची संधी उपलब्ध होईल, असे खंड्रे म्हणाले. “डिसेंबरमध्ये मी स्वतः त्या गावाला भेट देऊन चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी सहमती दर्शवली होती,” असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक अधिकाऱ्यांची तयारी
स्थानिक वन अधिकाऱ्यांनी आवश्यक ग्रामसभा आणि बैठका घेतल्या असून, इतर गावांचेही स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आकडेवारीनुसार
सद्यस्थितीत भीमगड अभयारण्यात १३ वाड्या आणि वस्त्यांमध्ये एकूण ७५४ कुटुंबे आणि ३,०५९ लोक वास्तव्यास आहेत. त्यापैकी तळेवाडीतील २७ कुटुंबांनी स्थलांतरासाठी संमती दिली आहे.
वनमंत्र्यांचा इशारा
“स्थलांतराच्या भरपाईची रक्कम अपात्र व्यक्तींना मिळू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष ठेवावे,” असा स्पष्ट इशाराही खंड्रे यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta