बंगळूर : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ आज प्रदेश भाजपने बंगळुरमध्ये तिरंगा यात्रा काढली. त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बंगळुरातील मल्लेश्वरम येथील शिरूर पार्क ते मल्लेश्वरम येथील १८ व्या क्रॉस रोडपर्यंत निघालेल्या या तिरंगा यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते आर. अशोक, राज्य भाजप प्रभारी राधा मोहन दास अग्रवाल, सह-प्रभारी सुधाकर रेड्डी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवादी नारायणस्वामी, माजी मंत्री सी. टी. रवी, आमदार एस. आर. विश्वनाथ, गोपालय्या, रवी सुब्रह्मण्य, उदय गरुडाचर, सी. के. राममूर्ती, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, आर. रघु, सतीश रेड्डी आणि भैरती बसवराजू यांच्यासह अनेक आमदार आणि नेते राष्ट्रध्वज घेऊन या तिरंगा यात्रेत सहभागी झाले.
सिटीझन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी या नावाखाली काढण्यात आलेली ही तिरंगा यात्रा निःपक्षपातीपणे आयोजित करण्यात आली होती. तिरंगा यात्रेत अनेक नागरिक, देशभक्त आणि विविध संघटनांचे नेते राष्ट्रध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते.
संपूर्ण तिरंगा यात्रेत भारतीय सशस्त्र दलांच्या समर्थनार्थ स्तुतीचे जयघोष करण्यात आले. तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्यांनी वंदे मातरम आणि भारत माता की जय असे नारे देत त्यांचा राष्ट्रीय अभिमान व्यक्त केला.
आज बंगळुरमध्ये तिरंगा यात्रा काढणाऱ्या राज्य भाजपने उद्या आणि परवा राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आणि १८ ते २३ मे दरम्यान सर्व तालुका केंद्रांवर ही तिरंगा यात्रा काढली जाईल.