अनधिकृत संपत्तीचा शोध; महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास
बंगळूर : सात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळी राज्यातील विविध भागात छापे टाकले.
बंगळूर, बंगळूर ग्रामीण, तुमकुर, यादगीर, मंगळूर आणि विजयपुर येथे एकाच वेळी छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सात भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकाच वेळी जाळ्यात पकडले आणि त्यांच्याजवळ असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा शोध लावला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आज सकाळी सात अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आणि रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने, वाहने, घरे आणि जमिनीच्या नोंदींसह कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा तपास हाती घेतला.
तुमकूर येथील निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक राजशेखर, मंगळूरचे सर्वेक्षण पर्यवेक्षक मंजुनाथ, विजयपुर येथील आंबेडकर विकास महामंडळ अधिकारी रेणुका, बंगळुर येथील नागरी व ग्रामीण नियोजन संचालनालयाचे अतिरिक्त संचालक मुरली टी. व्ही, कायदेशीर सर्वेक्षण निरीक्षक एच आर. नटराज, होस्कोट तालुकातील कार्यालयचे एसडीए अनंतकुमार यादगिरीच्या शहापूर तालुका कचेरीचे कर्मचारी अन्नपुरा उमाकांत यांच्या कचेरी व घरावर छापे टाकण्यात आले.
बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बंगळुरमध्ये १२, तुमकुरमध्ये ७, बंगळुर ग्रामीणमध्ये ८, यादगीरमध्ये ५, मंगळुरमध्ये ४ आणि विजयपुरमध्ये ४ ठिकाणी छापे टाकले आहेत.
तुमकुरमध्ये सात ठिकाणी छापे
लोकायुक्त पोलिसांनी तुमकुरमध्ये एकूण सात ठिकाणी छापे टाकले आहेत. निर्मिती केंद्राचे एम. डी. राजशेखर यांच्या घरावर छापा टाकला आहे. तसेच, या काळात, सप्तगिरी ब्लॉकमधील एस. एस. पुरम येथील राजशेखरच्या भावाच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दहा अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली.
गुलबर्गा येथे छापा
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुलबर्ग्याचे शहापूर तहसीलदार उमाकांता हळ्ळी यांच्या घरावरही छापा टाकला आहे, त्यांनी अक्कमहादेवी लेआउटमधील तहसीलदारांच्या घरातील आणि कार्यालयातील फायलींची तपासणी केली आहे.
मंगळूर, यादगीरी
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळूर येथील सर्वेक्षण पर्यवेक्षक मंजुनाथ, विजयपुर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर विकास महामंडळाच्या अधिकारी रेणुका आणि यादगिरी येथील शहापूर तालुका कार्यालय अधिकारी उमाकांत यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकले.
विजयपुर येथे छापा
विजयपुर शहरातील सेंट जोसेफ स्कूलच्या मागे डॉ. आंबेडकर विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक रेणुका सतार्ले यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला.
लोकायुक्तांनी बंगळुर ग्रामीण जिल्ह्यातील होसकोटे तालुक्यातील बोदनहोसहळ्ळी येथील एसडीए अनंत यांच्या घरावर छापा टाकला. देवनहळ्ळी आणि होस्कोट येथील जमीन वाटप विभागात काम करणाऱ्या अनंतवर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपांनंतर लोकायुक्तांनी छापा टाकून तपास केला.
कुठे किती छापे ?
बंगळुरू १२, तुमकूर ७, बंगळुर ग्रामीण ८, यादगीर ५, मंगळूर ४, विजयपुर ४
कोणावर छापे?
* राजशेखर: प्रकल्प संचालक, निर्मिती केंद्र, तुमकूर.
* मंजुनाथ: सर्वेक्षण पर्यवेक्षक, मंगळूर.
* रेणुका: डॉ. बी.आर. आंबेडकर विकास महामंडळाचे अधिकारी विजयपुर.
* मुरली टीव्ही: अतिरिक्त संचालक, शहरी आणि ग्रामीण नियोजन संचालनालय, बंगळुरू.
* एच. आर. नटराज: निरीक्षक, कायदेशीर मेट्रोलॉजी, बंगळूर.
* अनंत कुमार: एसडीए होस्कोटे तालुका कार्यालय, बंगळूर ग्रामीण.
* उमाकांत : शहापूर तालुका कार्यालय, यादगीर.